आत्मउमेदीची गुढी || 💐 -प्रवीण दवणे
|| आत्मउमेदीची गुढी || 💐
-प्रवीण दवणे
यंदाची गुढी ही आत्मउमेदीचे, वर्तमानाचे आव्हान आम्ही पेलणारच ह्या अजिंक्य मानसिकतेचे प्रतीक असणार आहे.
चेहेऱ्यावर सणासुदीचा आनंद सहज दिसण्याला आता 'मास्क 'चा आडपडदा असणार आहे. हर्षाने उल्हसित, स्वागतयात्रा काढणाऱ्या लेझिम नि जयघोषात नाचतगात निघालेल्या तरुणाईला गॅलरीतून बघण्याची ओढ गुढीलाही लागलेली असते. मधुर गाठयांची नि गेंदेदार हळदी झेंडूची माळ, गर्भरेशमी वस्त्राबरोबर , सजण्याची नि मिरवण्याची मिरास यंदा नाही. हे सगळं खरंय, पण सकारात्मक ऊर्जेचे ,विश्वात्मक प्रार्थनेचे बळच तिमिराला दूर सारून जिंकते. या एकात्मक मनांचे प्रतीक म्हणून यंदाची गुढी आपण उभारायची आहे.
प्रार्थनेत एक सुमंगल बळ असतं. यंदा जिथे आहोत तिथून विश्वाच्या आरोग्यासाठी पसायदान मागितलं, तर मनात दाटून आलेल्या तिमिरतळाला प्रकाशाचे आश्वासन निश्चितच मिळणार आहे.
प्रतीके केवळ परंपरेच्या आवरणात गोठवण्यापेक्षा ,वैचारिक बळावर नि काळाच्या संदर्भाने नव्या अर्थाने नव्या पिढीपुढे मांडल्यास, केवळ परंपरा म्हणून ती न रहाता वर्तमानाचे ताजे संदर्भ मिसळून, नदीप्रमाणे नवे प्रवाह स्वीकारून सखोल व समृद्ध होत, अनंताकडे निघेल.
मग यंदाच्या कातर मनःस्थितीत हा गुढीपाडवा केवळ रूढीपाडवा न ठरता ,नव्या चैतन्याचा शुभारंभ ठरू शकेल. भोवतीचे आव्हान पेलण्याची उर्जा त्यातून मिळेल. एका अर्थाने आत्ताचा काळ ही प्रलय काळाची केवळचुटपुटती झलक आहे.
प्रलयकाळ हा कधीच ,मी-मी- तू -तू- करण्याचा नसतो. तसे करणारा चिमूटभर वर्ग कुठल्याही काळात असणारच; त्यांना समजावून सांगण्यात वेळ नि उर्जा वाया घालवायची नसते. अशांना जीवनाचे मोल माहीत नसते, म्हणून मरणाचे भयही नसते. विसंवाद, श्रेयवाद, वितंडवाद हाच काहींचा प्राणवायू असतो. परंतु समाजातील आपल्यासारखा विधायक विचारांचा, एकात्म जिद्दीने , विपरीत परिस्थितीला, मनःस्थितिच्या अदम्य जिद्दीने सामोरे जाणारा खूप मोठा वर्ग आहे. पुढची प्रकाशवाट तोच प्रयत्नवादी समूह उजळणार आहे.
यंदाचा चैत्रोत्सव , जाणिवांच्या जागृतीचा मैत्रोत्सव करायचा आहे. आरोग्य व मानसिकतेच्या निर्भयतेचे पर्यावरण शुभेच्छेच्या बळाने एकमेकांच्या मनात उजळण्याचे जणु वचन देणारी, ही गुढी आहे.चैतन्याची ज्योत ,चैतन्यानेच तेवती ठेवणे ,ही एक आंतरिक साधना आहे. त्या साधनेचाच शुभारंभ म्हणून यंदाची गुढी उभारायची आहे.
***************
।।संपूर्ण लेख - या आठवड्यातील साप्ताहिक सकाळ- ।।
(आपल्या जिवलग समूहावर शुभेच्छा म्हणून आपण नक्कीच पाठवू शकता. धन्यवाद!)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा