२३ मार्च....!!! आज शहीद दिवस
भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या जहाल क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी त्यांच्यासमवेत कटामध्ये सामील असलेले शिवकर्मा, जयदेव कपूर आणि अन्य सहकारी यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेप झालेल्या या मंडळींना ती शिक्षा भोगण्यासाठी दुसर्या कारागृहात नेण्यात येणार होते. तेव्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकार्यांनी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांची शेवटची भेट घेण्याची त्यांना अनुमती दिली.
त्या भेटीत जयदेव कपूर यांनी भगतसिंगांना विचारले, ‘‘तुम्हाला फाशी देण्याचे ठरले आहे. अशा वेळी, ऐन तारुण्यात, मृत्यूला सामोरे जातांना तुम्हाला वाईट वाटत नाही का ?’’ तेव्हा भगतसिंग हसून म्हणाले, ‘‘अरे ! माझ्या प्राणांच्या बदल्यात ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा हिंदुस्थानच्या कानाकोपर्यात पोहोचवण्यात मी यशस्वी झालो आहे आणि हेच मी माझ्या प्राणांचे मूल्य समजतो. आज गजाआड असलेल्या माझ्या लक्षावधी बांधवांच्या तोंडून मी हीच घोषणा ऐकत आहे. इतक्या लहान वयात याहून अधिक मूल्य कोणते असू शकते ?’’ त्यांच्या तेजस्वी वाणीने सर्वांचेच डोळे पाणावले. त्यांनी कसेबसे हुंदके आवरले. तेव्हा त्यांची अवस्था पाहून भगतसिंग म्हणाले, ‘‘मित्रांनो, ही भावनावश होण्याची वेळ नाही. माझा प्रवास तर संपलाच आहे; पण तुम्हाला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला खात्री आहे की, तुम्ही दमणार नाही, हार मानणार नाही आणि थकून बसणारही नाही.’’
त्या शब्दांनी त्यांच्या सहकार्यांना अधिकच हुरूप आला. त्यांनी भगतसिंगांना ‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू’, असे आश्वासन दिले आणि ती भेट संपली. त्यानंतर भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलीदानाने हिंदुस्थानवासियांच्या मनातील देशभक्तीची ज्योत अधिक प्रखरतेने धगधगू लागली.....!!!
भगतसिंग हयांचे हे मनोगत....!!! मला चांगली कल्पना आहे की ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतीम क्षण असेल. बस्स इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतु न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. जय हिंद...!!!!" कोटी कोटी प्रणाम......!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा