सामाजिक भान देणारी शाळा


  रविवार, २५ मार्च २०१२
जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ बुद्रुक, लातूर
लातूर-किल्लारी परिसरात ३० सप्टेंबर, १९९३ रोजी झालेल्या भूकंपानंतर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या जनकल्याण समितीने ‘जनकल्याण निवासी विद्यालया’ची स्थापना केली. लातूरजवळील हरंगुळ येथील साडेनऊ एकर जमिनीवर वसलेला हा प्रयोग म्हणजे ‘चलो जलाएँ दीप वहाँ, जहाँ अभीभी अंधेरा है’ या पंक्तींप्रमाणे ग्रामीण, शेतकरी, निम्नमध्यमवर्गीय, उपेक्षित समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देणारा शैक्षणिक प्रकल्प आहे. या शाळेत साधारण गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शिक्षक-पर्यवेक्षकांच्या सहकार्याने तो उत्तम गुणवत्ता प्राप्त करतो असा अनुभव आहे.
आपल्याकडे शाळांमधून साचेबद्ध शिक्षण दिले जाते. या पाश्र्वभूमीवर जनकल्याण निवासी विद्यालयाची शाळा अनोखी शाळा ठरते. क्रमिक शैक्षिणक विकासासह चारित्र्य, सुसंस्कार, सदाचार, साहस, राष्ट्रभक्ती आदी गुणांचा विकास मुलांमध्ये व्हावा असा प्रयत्न केला जातो. त्यासाठी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत सुव्यवस्थित दिनचर्या रचण्यात आली आहे. विनोबा भावे म्हणत ‘प्रत्येक शाळेत घर घुसावे आणि प्रत्येक घरात शाळा शिरावी’. शिक्षण इतके अर्थपूर्ण व आनंदी असावे यासाठी जनकल्याणमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करण्यात येतात.
‘जनकल्याण’तर्फे दरवर्षी इयत्ता नववीची सहल ‘किल्ले रायगड’वर नेण्यात येते. याला सहल न म्हणता ‘मातृभूमीदर्शन’ असे नाव देण्यात आले आहे. त्याअंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून २६ जानेवारीचे ध्वजारोहण रायगडवर केले जाते. या सहलीचे वैशिटय़ म्हणजे रायगडावर दोन दिवसांचा मुक्काम, विद्यार्थ्यांनी केलेला स्वयंपाक, रात्रीची रक्षणव्यवस्था आदी. तसेच रायगडावर अनेक पर्यटक तेथील ऐतिहासिक वास्तूंवर, तोफांवर आपले किंवा प्रेयसीचे नाव लिहितात. अशी शेकडो नावे पाणी कापडाने पुसून टाकण्याचा उपक्रम जनकल्याणचे विद्यार्थी दरवर्षी करतात. यातून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर होतो.
‘जनकल्याण’चे आणखी एक वैशिटय़ म्हणजे उपक्रमशाळा होय. शनिवारच्या अध्र्या सुटीत उपक्रमशाळेची योजना करण्यात येते. त्यात वक्तृत्व प्रशिक्षण, स्थळभेटी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती, कार्यशाळा, चर्चासत्र आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यातून राष्ट्रभक्ती, शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर गणेशविसर्जनाच्या दिवशी प्रतिवर्षी निघणारी शोभायात्रा हा लातूरवासीयांच्या आकर्षणाचा विषय आहे. ‘जनकल्याण’चे विद्यार्थी यात मल्लखांब, ध्वजपथक, बर्चीनृत्य आदी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. त्याचबरोबर पर्यावरण, जागतिक तापमान वाढ यासारख्या प्रश्नांबाबत प्रबोधन करणारे देखावे आणि पथनाटय़े सादर केली जातात. समाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी असा जनकल्याणचा प्रयत्न असतो. सामाजिक भान असणारी, सृजनशील मुले घडवणारी जनकल्याण ही मोठी कार्यशाळाच आहे. यातून एक चिरंतन अनुभूती विद्यार्थ्यांना मिळते. शिक्षणाला यापेक्षा वेगळे ते काय साधायचे असते
               ©  दत्ता केशव माने

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे