अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड
शि-वा-जी या तीन अक्षरातून अदम्य प्रेरणा साठवून ठेवता येते. राष्ट्राच्या संक्रमणावस्थेत, पराधीन कालखंडात या नावानेच आम्हाला परकिय आक्रमकांशी झुंजत स्वाधीनता मिळवण्यासाठी प्रेरणा दिली. शिवचरित्राची प्रेरणा केवळ महायुद्धात व राजकारणात उपयोगी पडेल असे नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ती मोलाची आहे, म्हणून जनकल्याण निवासी विद्यालय प्रतीवर्षी वर्ग ९वी ची सहल रायगडावर नियोजित असते. याला सहल न म्हणता 'मातृभूमि दर्शन' असा शब्द वापरला जातो. गत २० वर्षापासून २५ व २६ जानेवारी ला किल्ल्यावर मुक्कामी राहून प्रजासत्ताक दिन रायगडावर साजरा करण्याचे भाग्य मिळते.
दुर्ग रायगडावर जाण्यापुर्वी गडाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि केवळ मौजमजा नाही तर इतिहासाविषयी जिज्ञासा व प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी काही पुर्व योजना केल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी साहित्य वाचन, किल्यावर असलेल्या वास्तूची बारिक सारिक माहिती मिळवणे. किल्ल्याविषयी माहिती पट दाखविले जाते. विविध लेखकांनी रायगडावर लिहिलेली माहिती अभ्यासून किल्ल्यावर जाण्यासाठी तयार होतात.
दि. २४ जानेवारी ला दुपारी आम्ही रायगडाकडे निघालो. मा. प्रांत उपाध्यक्ष रमेशराव जोशी , मुख्याध्यापक,प्रशासकिय अधिकारी,अधीक्षक यांनी शुभेच्छा देवून निरोप दिला. या सहलीत ८२ मुले, १७ मुली तर १२ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. प्रवासात असताना शिवरायांच्या जयघोषाने अंगात स्फुरण चढत होते. अदम्य प्रेरणेची वीज अंगात सळसळत होती.
दि. २५ जानेवारी २०२० रोजी शिवतीर्थ रायगड म्हणजे अजिंक्य असा इतिहास पुरूष. मे१६५६ रोजी शिवरायांनी हा किल्ला ताब्यात घेतला. हिरोजी इंदोलकर या स्थापत्याकडून पुर्ननिर्माण झाल्यावर यांचे नाव 'रायगड'असे केले. ४ सप्टेंबर १६५६ रायगडाचे श्रेष्ठत्व कळते ते शिवरायांनी चौफेर गड पाहिल्यावर व्यक्त केलेला अभिप्राय म्हणजे " गड बहूत चोखट, चौतर्फा गडाचेकडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट खरा परंतु तो उंचीने थोडका दौलताबाद चे दशगुणी उंच म्हणून तख्तास हाच गड करावा" अशा या रायगडावर पहाटे चित दरवाज्याने महाव्दारातून सूर्योदयापूर्वी आम्ही हनुमान टाक्या जवळ पोहचलो. निवासाचे ठिकाण असल्याने सोबतच्या मुलांसोबत जागा स्वच्छ करून राहूट्या उभ्या केल्या. जळण आणि अन्य व्यवस्था मार्गी लावून. सोबतच्या धपाटे व दही, चटणी चा आस्वाद घेतला. या सहलीचे वैशिष्ट्ये म्हणजे गडावर दोन दिवस राहूट्या मध्ये राहणे. रात्रीची रक्षण व्यवस्था, सर्व व्यवस्था विद्यार्थ्यांनी केल्या.तसेच विद्यार्थ्यांना किल्ल्यावरील प्रत्येक ठिकाण ची माहिती व्हावी म्हणून डोंबिवली चे किल्ला अभ्यासक सुरेश जी वाडकर यांनी किल्ला विषयी माहिती तसेच विविध पक्षाचे आवाज तर पुरातत्व विभागाचे तन्मयजी यांनी किल्लावर सुरू असलेले विविध ठिकाणचे उत्खनन या विषयी माहिती दिली. तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक हरिदास बाबळसुरे सरांनी सर्व ठिकाणची माहिती सविस्तर पणे सांगितले.
दि २६ जानेवारी ला रायगडावर भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला. गडावरील राष्ट्रध्वजाची लांबी २१ फुट आणि रूंदी १४ फुट आहे. या अविस्मरणीय कार्यक्रमाची तयारी विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थिनींनी भूमिअलंकरण केले. सर्वांनी विविध ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.
किल्यावरील बाल्लेकिल्ला, राजदरबार, राणीवसा मध्ये १६व्या शतकातील स्वच्छतागृह आजही पाहण्यासाठी मिळतात. म्हणजे स्वराज्यातील प्रजा किती संपन्न होती याची जाणीव होते. हिरकणी बुरूज, भवानी टोक, वाघ दरवाजा, टकमक टोक, बाजार पेठ, जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आदि ठिकाणीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जाणे झाले.
शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेताना मनात कृतज्ञता दाटून आली. समर्थांच्या शब्दाची आठवण झाली.
"शिवरायांसी आठवावे, जिवित तृप्त मानावे |
इहलोकी परलोकी उरावे,किर्तिरूपे || "
या दोन दिवसाच्या वास्तव्यात रायगडावरील प्रत्येक स्थानाचा इतिहास आम्ही समजून घेतला. येथील दुरावस्था मनाला अस्वस्थ करून गेली. शासनाच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करण्याचे कार्य सुरू आहे. खरे रायगड म्हणजे दगडमातीचा
ढिगारा नव्हे तर शिवस्पर्शाने पावन झालेले अखंड हिंदूस्थानचे धारातीर्थ आहे. त्याचे संवर्धन प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकांचे कर्तव्य आहे.
रायगडचा निरोप घेऊन आम्ही पायथ्याशी पाचाडला आलो. ज्यांनी शिवरायासारखा स्वाभिमान सुर्याला जन्म दिला मॉ जिजाऊ च्या समाधीचे दर्शन घेऊन तेथून निघालो. नारायणपूर च्या बालाजी तसेच पुढे जेजुरीच्या श्री खंडेरायाचे दर्शन घेतले. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
दत्ता केशवराव माने
जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु) लातूर
dattakmane@gmail.com
खूप छान !
उत्तर द्याहटवाआठवणी ताज्या झाल्या.
धन्यवाद
उत्तर द्याहटवा